About Us

नमस्कार
मी स्नेहल बाकरे. वाचन व लेखन हे माझे आवडते छंद. शाळेत असतानाच मला वाचनाची गोडी लागली. वर्तमानपत्रातील बोधकथा, चिंटू तसेच लहान मुलांसाठी असणाऱ्या साप्ताहिक पुरवण्या हे मी अगदी नियमाने वाचायचे. तसेच शाळेला सुट्टी लागली की ग्रंथालयात जाऊन तासन् तास निरनिराळी पुस्तके वाचायला मला खूप आवडायचे. हळूहळू माझ्या वडिलांनी मला एखादे पुस्तक वाचून झाल्यावर त्यावरचे माझे मत थोडक्यात लिहून काढण्याची सवय लावली. असे करता करता मला वाचना इतकेच लिखाणही आवडू लागले.
एकदा शाळेत असतानाच एका वृत्तपत्रात माझा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘गर्जा महाराष्ट्र की महाराष्ट्राच्या गरजा’ हा छोटासा लेख प्रसिद्ध झाला. लहान वयात असा लेख लिहिता आल्यामुळे माझे फार कौतुक झाले. व त्याने मला प्रोत्साहन मिळाले. शाळेत असताना बरेचदा लेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा यामध्ये मी सहभागी व्हायचे. तसेच अधून मधून मी वृत्तपत्रातील काही सदर वाचल्यानंतर त्याच्यावरचे माझे मत लिहून त्यांना पाठवायचे. परंतु पुढे महाविद्यालयीन अभ्यास, नोकरी, सांसारिक जबाबदाऱ्यां यांमध्ये लेखनाला थोडी विश्रांती द्यावी लागली. पण माझे वाचन मात्र सुरूच होते.
कोविड काळात मी पुन्हा एकदा माझ्या लेखनाला सुरुवात केली. दरम्यान माझी काही मतांतरे वृत्तपत्रात छापून आली. तसेच माझी ‘पाडवा नवजीवनचा’ ही कथा वृत्तवानपत्रात प्रसिद्ध झाली. त्यावर मला वाचकांनी अगदी भरभरून दाद दिली. बऱ्याच लोकांनी माझ्या इमेल वर कथेबद्दलचा त्यांचा अभिप्राय कळवला. त्यांना माझ्या लिखाणातील सहजता पण तितकाच खोलवरचा आशय खूप आवडला.
मग मी हळूहळू काही संस्थांसाठी त्यांच्या गरजेनुसार छोटे मोठे लेख लिहून द्यायला सुरुवात केली. हे सगळं करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपण प्रयत्न करत राहिलो की आपल्याला निश्चितच यश मिळते. तसेच आपल्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुणवैशिष्ट्य असतेच फक्त ते आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि त्या गुणवैशिष्ट्यांना उजाळा मिळण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असणे हे अत्यंत गरजेचे आहे.
…..आणि ‘कथा’ चे पर्व सुरू झाले.
दीपोत्सवानिमित्ताने माझे पहिले पुस्तक ‘स्नेह स्पंदने’ प्रकाशित झाले.

पाडवा नवजीवनाचा.
दिनांक २२ मार्च २०२० रोजी सकाळ या वर्तमानपत्रात पाडवा नवजीवनाचा लेख प्रसिध्द आहे.