About Sneh Spandane
पुस्तकाबद्दल काही….
मनुष्य हा एक वैचारिक क्षमता असणारा पृथ्वीतलावरील एकमेव प्राणी आहे. मनुष्य जीवनात विचारप्रक्रिया ही एक अखंड व अविभाज्य अशी प्रणाली आहे. जन्म ते मृत्यु अश्या प्रवासात विचारचक्र हे अविरतपणे चालुच असते. विचारांमध्ये एवढे सामर्थ्य आहे की, ते एखाद्याचे जीवन घडवूपण शकतात किंवा बिघडवूपण शकतात.
सामान्यतः विचारांची सकारात्मक आणि नकारात्मक अश्या दोन प्रकारात विभागणी केली जाते. सकारात्मक विचार हे एखादी वस्तू, घटना, व्यक्ती इत्यादींमधील चांगल्या बाबी आपल्या निदर्शनास आणुन देतात. त्यामुळे आपले मन प्रफुल्लित होऊन त्याला स्फूर्ती मिळते. आणि याच्या सहाय्याने आपण पुढे प्रगतीपथावर वाटचाल करू शकतो. असं म्हणतात की, ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि’. नकारात्मक विचार हे एखादी गोष्ट, घटना, व्यक्ती यांमधील केवळ त्रुटींवर आपले लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे आपले मन सतत अस्वस्थ व उदासिन बनते. आणि त्यामुळे कदाचित आपण चुकीचा निर्णय घेऊन आपले व आपल्या इष्टजनांचे नुकसान करून घेतो.
तरीही कित्येकदा असे निदर्शनास येते की, मनुष्याचा कल हा सकारात्मक पेक्षा नकारात्मक विचारांकडे जास्त प्रमाणात झुकलेला असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे, सध्याच्या सभोवतालच्या परिस्थितीमुळे एकंदरीत आपला दृष्टिकोनच तसा तयार झाला आहे. आणि यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपल्यासमोर जास्तीत जास्त सकारात्मक उदाहरणे येणे गरजेचे आहे.
सदर पुस्तकातील कथासंग्रह हे आपल्याला जीवनातील सकारात्मकतेवर प्रकाश टाकण्यासाठी मदत करतात. ह्या कथांमधील नायक/नायिका आपल्या सर्वांसाठी खरोखरच एक प्रेरणास्थान आहेत. नियतीने घातलेल्या घावामुळे अथवा आजारपण, अपयश, हेवेदावे, नैराश्य व इतर अशा जीवनात येणाऱ्या अनेक संकटांमुळे ते खचून जात नाहीत. उलट अतंत्य धैर्याने व जिद्दीने त्यांचा सामना करतात. सकारात्मक विचार, नियोजन व त्यांचे अचूक अवलंबन या त्रिसूत्रिंच्या आधारावर ते आपल्या दुःखावर, संकटावर यशस्वीरीत्या मात करतात. व त्यामुळे स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबीयांचे तसेच समाजातील इतर पीडित लोकांचे जीवन पुन्हा एकदा नव्याने फुलवतात. त्यांच्या जीवन प्रवासातून ते आपल्याला असे सांगण्याचा प्रयत्न करतात की, ‘संकटे ही आपल्या विनाशासाठी नव्हे, तर आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या जीवनात येत असतात. सभोवतालची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही आपण आपल्या आत्मविश्वासाच्या व सद्विचारांच्या जोरावर तिला नक्कीच अनुकूल बनवू शकतो.’