आज कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज. बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा हा सण. यालाच यमद्वितीया असेही म्हणतात.
पुराणात याबद्दल एक कथा सांगितली गेली आहे. सूर्यदेवताची पत्नी यांना दोन मुले – यम आणि यमी. यमी म्हणजेच पृथ्वीतलावरील यमुना नदी. यमी आपल्या भावाला म्हणजे यमराजांना आपल्या घरी येण्याचे नेहमीच आमंत्रण द्यायची. परंतू यमराज हे मृत्यूची देवता असल्याने ते कोणाच्याही घरी जाणे टाळायचे. एकदा कार्तिक शुद्ध द्वितीयेला अचानकपणे यमराज आपल्या बहिणीच्या घरी जातात आणि त्या दिवशी नरकातील पीडित जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले जाते. यमराजांना अचानक आलेले पाहून यमी अत्यंत आनंदित होतात व त्यांना औक्षण करून पंचपक्वान्नांच जेवण जेवू घालतात. त्यामुळे प्रसन्न होऊन यमराज आपल्या बहिणीला कोणताही वर मागण्यास सांगतात. तर यमी, ‘या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडे जाऊन अशा पद्धतीने औक्षण करून घेईल त्याला यमराजांपासून भय नसावे’ असा वर त्यांच्याकडून मागून घेतात. यमराजांनी त्यांना ‘तथास्तु’ म्हणून त्यांनी मागितलेले वरदान दिले. तसेच यमींनी दरवर्षी अशाप्रकारे घरी येऊन औक्षण करून घेण्याचेही वचन यमराजांकडून घेतले.
आणि यानंतर बहिण भावाच्या प्रेमाचे द्योतक अस